Tuesday, April 12, 2011

खिंड


परवा अनेक दिवसानंतर 'त्या' खिंडीची आठवण झाली. त्या खिंडीचे खरे नाव मला माहिती नाही. काही जण कादवे खिंड, धानेप खिंड, कादवे नॉच अशा नावाने संबोधतात. पण मी मात्र 'त्या' खिंडीला महाराजांची खिंड म्हणतो.   पानशेत धरणाच्या अलीकडे १ किमी अंतरावर एक रस्ता डावीकडे वर जातो. ह्याच रस्त्यावर साधारणतः १० किमीवर ही खिंड आहे. मोसे खोऱ्यातून वेल्हे खोऱ्यात जाणारा हा शिवकालीन मार्ग. सोप्या भौगोलिक भाषेत सांगायचे झालेच तर पानशेत मार्गे तोरण्याकडे जायचा हा रस्ता. महाराज बाजी पासलकरांना भेटायला ह्याच मार्गाने येत असत. काही वर्षांपूर्वी ह्या अनुषंगाची पाटी रस्त्याच्या सुरुवातीला उभी होती. म्हणजे अजूनही आहे, पण ती आता इतकी गंजली आहे की त्यावरचे एकही अक्षर नीट वाचता येत नाही; आणि महाराजांचे चित्रही धड दिसत नाही.

आता तुम्ही म्हणाल की ह्यात विशेष काय आहे मग? त्या खिंडीत कुठली लढाई झाली होती की कुठला असा ऐतिहासिक प्रसंग घडला होता, जेणे करून त्या खिंडीला 'विशेष' हा दर्जा देता येईल? - तर नाही. असे काहीही नाही. खरेतर तुमच्यासाठी काहीच विशेष नाही, कदाचित इतिहासासाठी पण नसेल. पण माझ्यासाठी नक्कीच आहे. ह्या खिंडीबद्दल माझ्या मनात एक विशेष आदराचे स्थान आहे.  

मला आठवते आहे की समीर आणि मी ६ वर्षांपूर्वी कॉलेजात असताना त्या खिंडीत प्रथम गेलो होतो. समीर त्या आधी काही वर्षे मुकुल सोबत जाऊन आला होता. मला समीरने इतकेच सांगितले होते की त्या खिंडीत गेल्यावर तोरण्याला प्रचंडगड का म्हणतात ते तुला कळेल.  सुरुवातीला पानशेत जलाशयाला (तानाजी जलाशय) लागून सुंदर रस्ता आणि नंतर मोडका घाटमार्ग असा हा केवळ १० किमी चा प्रवास. वाटेत दूरूनच ती खिंड लक्षात येते. दोन डोंगरांच्या मधील अगदी बारीक खाच. दूरून असे वाटतच नाही की त्या खाचेत रस्ता आहे म्हणून. घाटमार्गावर जंगलही फार सुरेख आहे. वळणा वळणाचा घाट चढून आपण जसे वर जात राहतो, तस तसा पानशेत, वरसगाव धरणाचा भव्य प्रदेश नजरेत येत जातो. एक शेवटचे १८० अंशातले वळण घेऊन आपण खिंडीसमोर काही मीटर अंतरावर येऊन उभे ठाकतो. खड्या चढावामुळे खिंडीपलीकडे काय असेल ह्याचा थांगपत्ताही लागत नाही. आणि खिंडीच्या मुखाशी पोहोचताच मागून अजस्र तोरणा डोके वर काढतो. आणि खुद्द खिंडीत पोहोचल्यावर आपोआपच उद्गार बाहेर पडतात - प्र... चं.... ड... ग... ड (ऍन्ड आय मीन इट). एका नजरेत न मावणारा असा प्रचंडगड.




'सर्वप्रथम मी जेव्हा खिंडीत गेलो होतो तेव्हा तोरणा पाहून झालेली माझी अवस्था शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही. मी बाइक वरून उतरून नतमस्तकच झालो होतो. ह्याच रस्त्याने महाराज अनेक वेळा आले गेले असतील. ह्याच खिंडीत उभे राहून त्यांनीही तोरण्याचे हे रूप मन भरून पाहिले असेल, अथवा हे रूप पाहून असेच भरून आले असेल. कदाचित त्यांनी ह्याच खिंडीतून तोरणा सर्वप्रथम पाहिला असेल आणि पाहताच क्षणी मनी विचार पक्का केला असेल. हाच, हाच गड जिंकून स्वराज्याचे तोरण उभारायचे. कदाचित ह्याच खिंडीत बाजी महाराजांना निरोप द्यायला येत असतील. महाराजही बाजींना कडकडून मिठी मारून 'बाजी आम्ही तुम्हावर अवलंबोनी आहोत. रयतेची काळजी घेणे, शत्रूंवर अंमल कायम ठेवणेअश्या मोजक्या शब्दात बाजींना निरोप देऊन राजगडावर आऊसाहेबांना भेटावयास अथवा कुठल्याश्या मोहिमे वर प्रस्थान करत असतील. न जाणे ह्या खिंडीने काय काय अनुभवले असेल. शेवटी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड ही. आणि त्याच खिंडीत मी आज उभा. बाइक साइडला लावून. लायकीहीन, क्षुद्र. पण माझ्यापेक्षा लायकीहीन अशी जनता ह्याच खिंडीत येत असते हे लगेच मला समजले. कारण वेफर्स, बिस्किटस आणि गुटख्याची काही पाकिटे लगेच आसपास दिसली. खरेतर ही तशी रिमोट जागा. आडवाटच. वाहता रस्ताही नव्हे. पण लोकांना काय? घर सोडून सर्व कचराकुंडीच वाटते.   

त्यानंतर महाराज मला माफ करतील ह्या आशेवर त्या खिंडीत येणे जाणे वाढले.  कधी मित्रमंडळींसोबत, कधी एकटेच, कधी चालत, कधी बाइकवरून, कधी चारचाकीने. वीकएंडला काहीच प्लॅन नसेल, कुठलाच ट्रेक नसेल तर त्या खिंडीत जाणे मी पसंत करतो.  

खिंडीतून खाली उतरून, मजबूत फोटो हापसून (आधुनिक पुणेरी मराठी मध्ये फोटो काढणे म्हणजे फक्त १०-१२ च फोटो काढणे, हापसणे म्हणजे मनसोक्त कसलेही आणि कितीही फोटो काढणे होय), पाबे घाटातून परत पुणे असा माझा अत्यंत आवडीच बाइकिंग शिरस्ता आहे.  

पहाटे लवकर खिंडीच्या पायथ्याशी पोहोचायचे,  कादवे गावात धारोष्ण दूध पिऊनच पुढे मार्गक्रमण.  मग खुद्द खिंडी मध्ये अर्धा तास बसून इतिहासाचा गाडा मागे फिरवायचा, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप - भूमंडळी... साक्षात तोरण्यासमोर आणि तोरण्याच्याच साक्षीने. पुढे धानेप गावा आधी वेल्हे धरणाच्या कालव्याजवळ बाइक पार्क करून त्याच कालव्यातून चालत धरणाच्या जलाशयापाशी पोहोचायचे. मग त्याच जलाशयाच्या काठाकाठाने पुढे चालू लागायचे.  

ह्या धरणाचा परिसर कमालीचा सुंदर आहे. एकतर ह्या भागात मनुष्यवस्ती अगदीच तुरळक, त्यामुळे गजबजाट, किलकिलाट अजिबातच नाही. शिवाय १२ महिने पाण्याचा तुटवडा नाही. त्यामुळे ह्या परिसरात भरपूर जैवविविधता आढळते. असंख्य प्रकारचे पक्षी आणि ससे हमखास नजरेस येतात.   पाण्याकाठी एका पायावर उभा राहून मत्स्यतपशचर्या करणारा बगळा आणि त्याच पाण्यात सूर मारून मत्स्यशिकार करणारा खंड्या. शिकार एकच, पण दोघांच्या वेगवेगळ्या पद्धती येथे अतिशय सुंदर रित्या न्याहाळता येतात. 




ह्याच जलाशयाच्या मधोमध एक लहानसे बेट आहे. ह्या बेटावर कमरे इतक्या पाण्यातून चालत चालत जाता येते. येथेच बगळ्यांची शाळा भरलेली असते.  ह्या बेटावर जाऊन तासभर निवांत बसायचे, पेशन्स राखून खंड्याचे शिकारी सूर कॅमेऱ्यामध्ये टिपायची (बऱ्याचं वेळा निष्फळ) धडपड करायची. त्याच बेटावर बसून न्याहरी उरकायची आणि पोर्टेबल गॅसशेगडी आणली असेल तर फक्कड चहाचा बेत जमवायचा. ह्या जलाशयाचे पाणी बाजारात मिळणाऱ्या कुठल्याही मिनरल वॉटर पेक्षा डिफॉल्ट भारी असतेच. त्यामुळे बाटल्या भरून परत पाण्यातून सरपटत काठावर यायचे आणि पुढे चालू लागायचे.




ह्या जलाशयाचा आकार इंग्रजी 'व्ही' अक्षराप्रमाणे आहे. आणि ह्या 'व्ही' च्या बेचक्यांत ३-४ लहान टेकड्या आहेत. काठाकाठाने चालत 'व्ही' च्या एका टोकाला पोहोचायचे आणि सरळ एखाद्या टेकडीकडे पाय वळवायचे. वाटेत एक सुंदर मंदिर येते. हवं तर मंदिराच्या गारेगार शहाबादी फरशीवर अर्धा तास ताणून द्यायची. पुढे जात राहिलो की एक ओढा आडवा येतो. त्यावर एक उंच पण अरुंद पूल आहे. हा पूल ओलांडला की थेट टेकडीचा पायथा.  

टेकडी चढून आजूबाजूचा प्रदेश न्याहाळावा. आपण व्ही च्या बेचकीमध्ये उभे असतो आणि दोन्ही बाजूस पाणी. समोर आपल्या टेकडीच्या किमान १५ पट उंच तोरणा. तो पाहून परत एकदा नतमस्तक व्हायचे आणि आलो त्याच मार्गाने परतीचे प्रवास सुरू करायचा. आता ऊन वर आले असते, दमछाकही बरीच झालेली असते आणि बाइक पर्यंत पोहोचायला किमान एक तास, त्यामुळे आपोआपच पाउले झरझर पडू लागतात. वाटेत परत एकदा ते बेट दिसते; मोह आवरला जात नाही आणि काही कळायच्या आत, कॅमेरा आणि बॅग काठाशी ठेवून, बूट काढून आपण पाण्यात सूर मारलेला असतो. आता मनसोक्त डुंबायचे.

पोटातले कावळे लवकरच आपल्याला भुकेची आठवण करून देत पाण्याबाहेर खेचतात. डोळ्यासमोर वेल्ह्यातले 'तोरणा विहार' दिसू लागते. ते चुलीवरचे जेवण... आहाहाहा. चैत्र सरून गेला असेल तर नजर करवंदाची जाळी शोधू लागतात. चालत चालत आपण बाइक पाशी पोहोचतो देखिल आणि पुढे २० मिनिटामध्ये तोरणा विहार. उदरभरणानंतर पाबेघाटा मार्गे पुण्यगमन. संध्याकाळी चहा घ्यायला घरी.  असा हा क्वालिटी आणि दर्जेदार प्लॅन अमलात आणून रविवार सार्थकी लावण्यासारखे दुसरे सुख नाही. 

आणि ह्या स्वर्गसुखाला जोडणारा दुवा म्हणजेच ती महाराजांची खिंड.  खिंडीच्या एका बाजूला पुण्याची बाजू, ते शहरी धकाधकीचे जीवन (आता पुण्यातल्या जीवनाला मी धकाधकीचे जीवन म्हणून मी तमाम मुंबईकरांची माफी मागतो), ट्रॅफिक जॅम, प्रदूषण आणि इतर अनंत कटकटी; तर खिंडीच्या दुसऱ्या बाजूस स्वर्ग. पुण्यापासून केवळ ५० किमी दूर. कुणी मला विचारले 'वीकएंड गेटवे म्हणजे काय? ' तर मी त्या खिंडीकडे बोट दाखवेन. तो आहे गेटवे. त्याच्या पलीकडे स्वर्ग आहे. त्या खिंडीला मी वीकएंड गेटवेचा 'फिजिकल स्टेटस' प्रदान केला आहे.    खिंडीपलीकडच्या लोकांना पुण्याचे अप्रूप, तर मला खिंडी पलीकडल्या जीवनाचे. ग्रास इज ऑलवेज ग्रीन ऑन दी अदर साइड ह्या म्हणीचा हा जिवंत पुरावा.  

अशा ह्या खिंडीत गेले ६ महिने जाणे झालेच नाही. परवा पहाटे  कॅलेंडर चाळता चाळता शिवजयंती जवळ आलेली पाहून त्या खिंडीची आठवण झाली. रविवार होताच. वेळ तर असतोच. नसला तरी खिंडीत जायला वेळ काढणे अशक्य नक्कीच नाही. मग आता अजून कसला मुहूर्त हवा? म्हटले कुणाला तरी विचारावे, इच्छा असेल तर येईल कुणीतरी. तोच समीरचा मेसेज आला. तयार होऊन खाली ये ५ मिनिटांत, महाराजांच्या खिंडीत जायचे आहे.....



8 comments:

Unknown said...

ब्लॉग वाचला... छान वाटला. तुझी शैली अतिशय ओघवती आहे!
बऱ्याच दिवसांनी प्रवास-वर्णन वाचायला मिळालं.. वाचून खरच मस्त वाटलं... असाच लिहित राहा.
एक दिवस हे सगळे ब्लॉग्स संकलीत करून एखादं पुस्तक प्रकाशित केलास, तर ते वाचायला मला नक्की आवडेल...
तुला भविष्यकाळासाठी खूप खूप शुब्भेच्छां !!! :)

Unknown said...

Farach bhari lihalay!!

Kapil Balki said...

Majhi Itihasa Baddal chi OOdh aani
Shivrayanchi Mahiti suddha far Alpa ashi aahe... Ya Goshti chi Khanta Mhanu nach tujhe blogs Agdi na chukta Vachto, Tujhe Blogs Vachun Ji tujhya mana madhye Maharajan sathi asleli Anubhuti aahe ti agdi Majhya Manamadhye Ghar karun jate agdi Manapasana tula Dhanyawad Dyawayachi iccha hote karana ya saglya mahitisathi mala kuthlyahi Prakaracha pustak vachayachi garaj nahi .. Natekarancha Blog vachala ki Bass Pure Jhala...

Padmakar (पद्माकर) said...

नेहेमीप्रमाणेच अप्रतीम वगैरे लिहीत नाही. Standing Instruction सारखी माझी ही Standing Comment अध्याहृत धरून चाल.

मला कधी नेतो आहेस?

Unknown said...

masta masta masta! tuzi lihinaychi shaili pharach chan aahe. aasech lihit raha. Vachun aamhala pratakshya pahilyache samadan vatale. sampurna khind dolyapudhe ubhi kelis.
keep it up!

aai

niranjan said...

LEKHANACHI changli khind ladhavtoys. asach lihit raha ani khind ladvit raha

Anshuman said...

Blog Vachala.. jhakas aahe... tu kelel varnan vachi thithe javese vatate..

Jit's Katta said...

मित्रा तू पाबे खिंडी बद्दल लिहिले आहेस. खानापूर मार्गे वेल्हे. तोरणा पायथ्या हून २२ किमी वर मढे घाट किंवा उपन्द्या घाट आहे पुण्याच्या जवळचा स्वर्ग. अधिक माहिती साठी http://ajitgadhave.blogspot.in/2013/06/madhe-ghat-keladh.html