बाहरीनला, शहरापासून दूर, भर वाळवंटात मधोमध एक
वृक्ष उभा आहे. गेली ४०० वर्षे ह्या वृक्षाला पाणी कसे मिळते हे एक कोडेच आहे.
कारण आसपास पाण्याचा काहीच स्रोत उपलब्ध नाही, एवढेच काय तर ह्या वृक्षाच्या
आसपास एकही वनस्पती आढळत नाही. फक्त वैराण वाळवंट. ह्या जागेला ‘ट्री ऑफ लाईफ’
असे नाव आहे. अनेक दिवसांपासून ही जागा पाहायची इच्छा होती.
परवा भर उन्हाचा निघालो. आधीच बहारींनी उन्हाळा
म्हणजे काय विचारता? तापमान सुमारे ५२ अंश असेल. आर्द्रता ९० च्या पुढे. अंगाची
नुसती लाही लाही होत होती आणि घामाच्या संततधारा. ट्री ऑफ लाईफचा
रस्ता वाळवंटातून. जागा शोधता शोधता नाकी नऊ आले. अशा प्रसंगी GPS मार्गदर्शकाची उणीव
अगदी प्रकर्षाने भासते. अखेरीस ती जागा सापडली (म्हणजे दूरूनच ओळखता आली कारण त्या
ओसाड वाळवंटात एकच झाड उभे दिसले.).
वृक्षाचा विस्तार चांगला ऐसपैस आहे. अगदी भक्कम फांद्या, रुंद खोड आणि महत्त्वाचे
म्हणजे ह्या उन्हाळ्यात सुद्धा अगदी तजेल हिरवेपणा. एकही पान सुकलेले नाही. सारे
काही अगदी टवटवीत. आणि हे सर्व गेली ४०० वर्षे असेच.
५ मिनिटातच मी उकाड्याने हैराण झालो होतो. पण वृक्षाच्या
साअवलीत जरा बरे वाटत होते. मनात सहज विचार आला – मी ह्या जागी आलो वातानुकूलित गाडीतून.
५ मिनिटे झाली नाहीत तोच जीव कासावीस झाला आहे. ह्या वृक्षाने असे ४०० उन्हाळे
झेलले आहेत आणि अजून किती झेलेल ते माहिती नाही. आव तर अगदी ‘अजुनी यौवनात मी’
असा. पाणी तर नाहीच. तरी ह्या विस्तीर्ण वाळवंटात ह्या तपस्वीची अखंड तपश्चर्या
सुरूच.
ह्या वृक्षाने अत्यंत खडतर अशा नैसर्गिक
परिस्थितीचा सामना केला असून, ४०० वर्षाचे जीवन अगदी एन्जॉय केले आहे. पाहा अजून
कसा टवटवीत दिसतो आहे ते. जीवनाकडून त्याला काहीही अपेक्षा नाहीत. साधी पाण्याचीही
अपेक्षा नाही हो. त्याला फक्त जगायचे आहे. आनंदात, सुखात आणि समाधानात. अजून पुढे
अनंत शतके आयुष्य उपभोगायचे आहे. ह्या जागेला ट्री ऑफ लाईफ का म्हणतात हे मला तेव्हा अगदी प्रकर्षाने जाणवले. जीवनातल्या अडचणी,
प्रोजेक्टच्या साडेसाती, ऑफिसचे टेन्शन, घराच्या अडचणी, इतर अनंत कटकटी ह्यालाच
जीवन असे म्हणतात का? कारण तसे पहिले तर सर्वांचे जीवन हे असेच असते. ह्या
सगळ्यावर मात करून, आहे ती परिस्थिती स्वीकारून,
आनंदी राहून प्रगतीचा आलेख नक्कीच उंचावता येईल. उगीच मनस्ताप करून घेऊन, चिडचिड
करून घेऊन आहे ते जीवन उगाच का नासवावे?
आज मी काय नि माझी पिढी काय? सर्व जण आय.टी. धारी
उत्तम पगाराच्या नोकरीवर असूनही असंतुष्ट. सतत रडारड. सतत नवीन नोकरीचा शोध.
स्वप्नांच्या मागे आंधळेपणाने धाव (धाव की हाव?). समाधानी वृत्तीचा अभाव. जीवनात
बरेच काही कमावून बरेच काही गमावले आहे असे सातत्याने वाटत राहते. आता अजून किती
गमावणार? कधी मला हे आयुष्य समजणार? असंतुष्टता आणि मनस्ताप हाच जीवनाचा पाया.
पायाच डळमळीत तर वरचा डोलारा काय टिकणार? कधी मी आनंदी होणार?
त्या ४०० वर्ष पुरातन (की तरुण?) तपस्वीने मला केवळ
५ मिनिटात बरेच काही शिकवले. पाणी ही सर्व सजीवांची मूलभूत गरज. त्या वृक्षाच्या
मूलभूत गरजा देखील पूर्ण होत नाहीत. तरीही त्याचा आनंदी जीवन जगायचा अट्टहास
दांडगा. एवढेच नाही तर देण्याची वृत्तीही दांडगी. ओसाड वाळवंटात, ५०-५५ अंश
तापमानात आलेल्या पाहुण्याचे स्वागत छायेमध्ये (शीतल छाया म्हणू शकत नाही कारण ५२ अंशामध्ये
काहीही शीतल नसते. पण खरे सांगतो त्या वृक्षाची सावली नसती तर मी गाडीतून खाली
देखील उतरलो नसतो. ५-१० मिनिटे का होईना, मी त्या वातावरणात तग धरू शकलो ते केवळ
ह्या सावलीमुळेच). किती ही निरअहंकारी वृत्ती? आज मी फक्त माझा स्वार्थ पाहतो.
खाऊन पिऊन सुखी आहे, सर्व गरजा पुरवल्या जात आहेत, तरीही मन आनंदी नाही. काय
म्हणावे आता?
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आनंदी जगून, जीवनाचे
कोडे उलगडवून सांगण्याचा हा ह्या तपस्वीचा एक अट्टहास पाहून खरंच कौतुक वाटले. ट्री ऑफ लाईफ संपूर्ण
मानवजाती साठी एका अव्याहत नवचैतन्याचा उर्जास्रोत आहे. नवचैतन्य जे प्रतिकूल
परिस्थितीत आनंदी जीवन जगून, स्वउन्नती करून, इतरांसाठी काही करण्याची तळमळ आणि प्रेरणा पल्लवित करेल.
जीवन वृक्षा असाच वृद्धिंगत होत राहा.
गुगल एपीआय ने एम्बेड केलेला नकाशा पहा. वृक्षाच्या आसपास कुठलीही वनस्पती आढळणार नाही.
तसेच सोबतीला एक फोटो.
View Larger Map
2 comments:
Existence of this tree is indeed a mystery.
Your point of view - to use this tree as metaphor for anyone that fights against adversities and still leads a happy & content life - is a new angle.
Ironically, the same IT field where most people are not content has also made experiences and trysts with such fantastic things in life possible for us, isn't it?
जीवन वृक्ष आणि मढे घात यावरील तुझे अनुभव आणि विचार वाचले ते खूप चांगले वाटले..
तुझी लेखन शैली एखाद्या WELLSET लेखकाप्रमाणे आहे.
_विनय रा. बर्वे.......
vin912@rediffmail.com
Post a Comment